मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा - डॉ. रवींद्र बेम्बरे


मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा

            
           भारत मातेच्या मुक्तीसाठी आपल्या सर्वस्वाची आहुती दिलेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांची आढळ राष्ट्रनिष्ठा मराठी कवितेतून तितक्याच उत्कटतेने प्रकटली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नितळ प्रतिबिंब जसे मराठी कवितेतून उमटले, तसेच स्वातंत्र्य आंदोलनास गती देण्याच्या दृष्टीनेही ती पूरक ठरली. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी एक पोषक मनोभूमिका तयार करण्यात मराठी कवितेचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे.  आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील एक महत्त्वाचा प्रवाह म्हणून राष्ट्रीय कवितेकडे पाहिले जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळी बरोबरच राष्ट्रीय कवितेचा हा प्रवाह उत्क्रांत होत गेला. स्वातंत्र्यवीरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्राप्रतीची बांधिलकी, त्याग, समर्पणभाव या बाबी राष्ट्रीय कवितेतून सहजगत्या साकारलेल्या आहेत. वारकरी संत कवितेत जशी उत्कट विठ्ठलभक्ती आहे, तशी राष्ट्रीय कवितेत राष्ट्रभक्ती आहे. राष्ट्रीय विचाराने भारलेल्या देशसेवकांच्या भावविश्वाचे दर्शन राष्ट्रीय कवितेने घडवले आहे. सरकारने कारागृहाच्या भिंतीची उंची कितीही वाढवली तरी त्याची  पर्वा देशभक्तांना वाटत नाही. 
"वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती
मन्मना नाही क्षिती
भिंतीच्या उंचित आत्मा राहतो का कोंण्डूनी
मुक्त तो रात्रंदिनी"०१
        इंग्रज सरकार कैद करून कितीही उंच भिंती असलेल्या कारागृहात टाकले तरी आपल्याला त्याची तीळमात्र काळजी नाही, कारण निसर्गतः स्वतंत्र असणारा आपला आत्मा जगातल्या कोणत्याही कारागृहात कैद राहू शकत नाही, असे कवी यशवंतांच्या कवितेतील स्वातंत्र्यवीर म्हणतो. स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय नजरेसमोर ठेवून क्रांतीच्या मार्गावर वाटचाल करत असताना कारागृह, बेड्या, शूळ आणि मरण या गोष्टी अपरिहार्य असल्याची जाणीव या देशसेवकांच्या मनात आहे.  म्हणून या गोष्टीबद्दल खंत किवा दुःख बाळगण्यापेक्षा त्यांनाच भूषण मानतात. कारागृह म्हणजे आपल्यासाठी महाल, गळ्यातीळ फास जणू पुष्पहार, आपला देह जाळण्यासाठी रचलेली चित्ता म्हणजे सिंहासन; तर शूळ हा जणू राजदंड असल्याचे ते सांगतात. राष्ट्रासाठी आलेल्या मृत्यूने अमरता प्राप्त होते, ही त्यांची श्रद्धा असल्याने मृत्यूही त्यांच्यासाठी दैवत वाटत असतो.
"देशभक्ता प्रासाद बंदी शाळा,
शृंखलाच्या गुंफिल्या पुष्पमाळा
चित्ता सिंहासन शूल राजदंड
मृत्यू दैवत दे अमरता उदंड"०२
         असे कवी विनायक आपल्या कवितेत म्हणतात. स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारलेल्या देशभक्ताच्या मनातील बेहोशी कवी विनायकांच्या कवितेतून पाहायला मिळते. यशवंत आणि विनायक यांनी सुरुवातीच्या काळात राष्ट्राप्रती समर्पित स्वातंत्र्यवीरांच्या भावना आपल्या एकदोन स्फूट कवितेतून मांडलेल्या आहेत. राष्ट्रासाठी सर्वस्वाची आहुती द्यायला सिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कवितेचा आरंभ झाल्याचे अभ्यासक सांगतात. मातृभूमीच्या विरह वेदनेतून निर्माण झालेल्या 'सागरास' या अप्रतिम काव्यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मातृभूमीवरील उत्कट प्रेम आणि तिच्या भेटी आड येणाऱ्या सागरावरचा रोष प्रकटला आहे. लंडन पासून पन्नास मैल अंतरावर असलेल्या ब्रायटन समुद्राकाठी सावरकरांना जेरबंद केल्या जाते, तेव्हा सावरकरांनी बाजूच्या समुद्रास उद्देशून आपल्या अंत:करणातील तगमग प्रकट केली आहे. 'सागरास' या कवितेतील शब्दाशब्दातून सावरकरांच्या मनात ओतपोत भरलेली राष्ट्रनिष्ठा व्यक्त झाली आहे. भारतमातेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सावरकरांना दाही दिशा अंधकारमय वाटतात. भारतमातेच्या वैभवाची त्यांना प्रकर्षाने आठवण होते. इंग्लंड मधील उंच उंच महालापेक्षा भारतभूमीवरील झोपडीच आपल्याला विलक्षण प्यारी असल्याचे ते सांगतात.
"नभिं नक्षत्रें बहुत एक परी प्यारा । मज भारतभूमिचा तारा
 प्रासाद इथे भव्यपरी मज भारी । आईची झोपडी प्यारी 
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा। वनवास तिच्या जरी वनिचा"०३
      सावरकरांच्या मनात भारतभूमीबद्दल असणारी ओढ या कवितेतून अत्यंत उत्कटपणे साकारली आहे. सावरकरांचे अवघे कुटुंब देशकार्यासाठी समर्पित होते. दिव्य आणि दाहक असणारे देशसेवेचे हे व्रत्त म्हणजे सतीचे वाण असून आपण आंधळेपणाने घेतले नसून अत्यंत विलक्षण डोळसपणे सारासार विचार करून घेतल्याचे ते सांगतात. तिघा ऐवजी आपण सात जण जरी भाऊ राहिलो असतो, तरी आपले पूर्ण आयुष्य आम्ही भारतभूमीसाठीच वाहिलो असतो, असे सावरकर म्हणतात. मातृभूमीसाठी आपले वक्तृत्व, वाग्वैभव, शरीर, घरदार संपत्ती, अवघे कुटुंब आणि मित्र यांचा बळी दिल्याबद्दल सावरकरांच्या मनात कुठला पश्चाताप नाही; तर उलट  कृतार्थतेची भावना आहे.
"जयोsस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवते ! त्वामहं यशोयुतां वंदे ।।
तुजसाठी मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल चराचर शरण"०४
            भारत भूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आलेल्या मरणाने खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होते. भारतभूमीसाठी काहीच न करता निष्क्रियपणे जगणे म्हणजेच जिवंत असून मरणे आहे, अशी जी भूमिका सावरकर मांडतात त्यातून त्यांच्या मनातील प्रखर राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडते. सावरकरांच्या कवितेतील राष्ट्रनिष्ठेबद्दल अर्वाचीन कवितेचे अभ्यासक डॉ. अक्षयकुमार काळे लिहितात, "जाज्वल्य राष्ट्रीयवृत्ती, उत्कट राष्ट्रभक्ती, अपूर्व स्वदेशाभिमान आणि संघर्षशील आत्मत्यागातून या कवितेचा जन्म झाला असल्यामुळे केशवसुतानंतर केवळ दहा वर्षातच अपूर्व तेजोवलयाची जाणीवपूर्वक राष्ट्रीय कविता लिहिणारे सावरकर हे आधुनिक मराठी काव्यातील पहिले राष्ट्रीय कवी आहेत."०५ विविध अभ्यासकांकडून सावरकरांना मराठीतील आद्य राष्ट्रीयकवीचा जो मान मिळाला तो त्यांच्या कवितेतील प्रखर राष्ट्रनिष्ठेमुळे होय. 
         आपली समग्र काव्यप्रतिभा स्वातंत्र्य या विषयाला वाहिलेले मराठी काव्यविश्वातील एकमेव कवी म्हणजे स्वातंत्र्यकवि गोविंद होत. "स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकर वगळल्यास सबंध महाराष्ट्रामध्ये अव्यभिचारी वृत्तीने स्वातंत्र्यस्तोत्रे गाणारा कवी, कवी गोविंदा वाचून या आधुनिक काळात दुसरा झाला नाही! बॅरिस्टर सावरकरांच्या संगतीने नि स्फूर्तीने कवी गोविंदांचा काव्यनयन जो एकदा उमलला, काव्यसंस्काराचे उपनयन जे एकदा झाले, ते त्यांचे पार्थिव नयन मिटेपर्यंत स्वातंत्र्यदेवीकडेच अनिमिषतेने खिळले गेले."०६ असे ना.दा सावरकर कवी गोविंदबद्दल महत्त्वपूर्ण विधान करतात. कवी गोविंद यांनी स्वातंत्र्याचा पाळणा लिहिला. त्यांनी जी भारताची आरती लिहिली त्यातून भारतभूमीचा गौरवशाली इतिहासच मांडला. भारतभूमीला जशी शौर्याची आणि पुरुषार्थाची परंपरा आहे, तसेच स्वातंत्र्य रक्षणाची पूर्वापार परंपरा असल्याचे कवींनी नमूद  केले आहे.
"जय शुरा जय वीरा जय भारत राष्ट्रा।
 गातां तव जयगीता कविता संतुष्टा ।।
अमित रणें, अमित शत्रु, अमित पारतंत्र्यें।
अमित वेळ खंडियेलीं स्वाशनिसंपातें।
 अमित श्रमें संरक्षुनि ईश्वरिं स्वातंत्र्यें। 
अमित यशें भूषविलीं भू तूं यशवंतें।।"०७  
           भारत देशाने असंख्य युद्ध मैदाने आणि असंख्य शत्रुंना जिंकून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. आपला इतिहास लक्षात घेता युद्धाशिवाय स्वातंत्र्य मिळूच शकत नाही अशी भूमिका मांडून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी मैदानावर उतरण्यास कवींनी उद्युक्त केले. "रणावीन स्वातंत्र्य कोणा मिळेना । असा भूतकालीन सिद्धांत जाणा।।"०८ कवी गोविंद यांनी त्या काळात मांडलेला हा सिद्धांत खूप परिणामकारक ठरला. 'रणावीन स्वातंत्र्य कोणा मिळेना।' या ओळीस स्वातंत्र्य आंदोलनात सुभाषिताचे मोल प्राप्त झाले. त्यांच्या या विचाराचा प्रभाव त्या काळातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीवर झाल्याचे सांगितले जाते. 'उठ भारता, उठ झडकरी, ये मंगलवेशा।' या कवितेतून स्वतंत्र भारताचे स्वप्न रंगवून भारतीयांच्या मनात नवा आशावाद जागवण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यकवि गोविंद यांनी केला.
          स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर आणि स्वतंत्र्यकवि गोविंद यांचा राष्ट्रीय कवितेचा हा वारसा कवी कुंजविहारींनी  तितक्याच निष्ठेने पुढे चालवला. 'माझे ध्येय' या कवितेत त्यांनी आपले राष्ट्रनिष्ठ जीवनध्येय स्पष्ट केले. देशासाठी बलिदान दिलेल्या देशभक्तांच्या मनातील अविचल राष्ट्रनिष्ठा कवी कुंजविहारीच्या कवितेतून अत्यंत परिणामकारकपणे व्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेबद्दल डॉ. अक्षयकुमार काळे लिहितात, "स्वातंत्र्याच्या आंदोलनात तुरुंगामध्ये जाणाऱ्या, फाशीच्या तक्तावर हसत- हसत लटकणाऱ्या धिरोदात्त क्रांतिवीरांचे मनोगत व्यक्त करणारी 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता त्यांच्या देशभक्ताप्रती असलेल्या उत्कट समरसतेचे लक्षणीय उदाहरण आहे."०९ देश स्वातंत्र्यासाठी लढा उभारलेल्या एकुलत्या एक मुलाला फांशीची शिक्षा होते. आपल्या आईची शेवटची भेट घेण्यासाठी तो येतो. भेटीनंतर पोलिस ओढून नेत असताना आक्रोश करणाऱ्या आपल्या आईस उद्देशून देशभक्त मुलाने  साधलेला संवाद म्हणजे 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही  अजरामर कविता आहे. कवी कुंजविहारींनी भारतीय तत्त्वज्ञानातील पुनर्जन्माची संकल्पना अतिशय समर्पक रीतीने या कवितेत वापरली.  आता जरी मला हे सरकार फासावर चढवत असले, तरी मी देशासाठी मरणाला सामोरे जात असल्यामुळे तूझ्या उदरी मी परत नऊ महिन्यांनी याच मातीत जन्म घेईन असा विश्वास हा देशभक्त प्रकट करतो. 
"लाभतें जया, वीर-मरण भाग्याचें। वैकुंठपदी तो नाचें
दे जन्म मला, मातृभूमिचे पोटीं । पुन: पुन्हां मरण्यासाठीं
मागेंन हेच श्रीहरीला
मातृभूमी उद्धरण्याला
स्वातंत्र्यरणीं लढण्याला
तव शुभ उदरीं, जन्म पुन्हां घेऊनीं । भेटेन नऊ महिन्यांनीं ।।"१०
           ज्या मातीतील अन्नपाणी सेवन करून आपण वाढलो, तो देह मात्र मातृभूमीसाठी सार्थकी लागण्यातच खरा पुरुषार्थ आहे ही देशभक्तांची अविचल राष्ट्रनिष्ठा कवी कुंजविहारीनी येथे रेखाटली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील 'तुजसाठी मरण तें जनन' ही भूमिका या कवितेतून पुन्हा प्रतिध्वनीत झाल्याचे पाहायला मिळते.
           साने गुरुजींच्या स्वच्छ आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात पडले आहे. गुरुजींच्या मनातील जाज्वल्य देशभक्ती त्यांच्या 'पत्री' या काव्यसंग्रहातून पदोपदी प्रत्ययास येते. देशप्रेम ही गुरुजींच्या काव्याचीच नव्हे तर समग्र जीवनाची प्रेरणा होती.  "बहुभाग्याने बहु पुण्याने झालो तव संतान । तव सेवा मम हातून होता हरपो माझा प्राण"११  ही त्यांची मनीषा होती. हौतात्म्य हेच त्यांचे स्वप्न होते. परतंत्र भारतीयांच्या असह्य वेदना पाहून त्यांचा आत्मा पिळवटून निघतो आणि स्वाभाविकपणे ते म्हणतात, "स्वार्थाची करुनी होळी। छातीवर झेलू गोळी। करू मृत्यूशी खेळीमेळी। मातृभूमीच्या साठी मोदे करू सारे बलिदान ।।"१२  वैयक्तिक स्वार्थाची होळी करून देशासाठी सर्वस्वाचे बलिदान करायला सिद्ध असल्याचे ते सांगतात. 'भारत सेवा', 'मरणही ये तरी वरिन मोदे', 'बलसागर भारत होवो', 'देशासाठी मरू', 'मातृभूमी गाण', 'उठ भारता' इत्यादी कवितेतून त्यांच्या ठिकाणची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती आणि देशभक्ता विषयीचे निरतिशय प्रेम प्रकटले आहे. 'सत्याग्रही' हे १९३० सालच्या राजकीय आंदोलनावर आधारित त्यांचे खंडकाव्य आहे. सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे घडलेल्या तुरुंगवासात मृत्युमुखी पडलेल्या मृत्तपुत्राने दिव्यवेष धारण करून आई-बापांची घातलेली समजूत, असे या खंडकाव्याचे स्वरूप आहे. कवी अज्ञातवासींच्या कवितेतून जाणवणारे ठळक विशेष म्हणजे त्यांचे  इतिहासप्रेम व देशाभिमान होय. पारतंत्र्यामुळे अवनतावस्थेला पोहोचलेली देशस्थिती पाहून वाटणारे खेद त्यांच्या कवितेत प्रकटले आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील पूर्ववैभवाचे दर्शन घडवून राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न कवी अज्ञातवासींनी केला आहे. अज्ञातवासींची भाषा ही अत्यंत ओजस्वी आणि प्रासादपूर्ण आहे.
            कवी कुसुमाग्रजांच्या  'विशाखा' काव्यसंग्रहातील 'क्रांतीचा जयजयकार', 'टिळकांच्या पुतळ्याजवळ' या कविता उत्तम राष्ट्रीय कविताच आहेत. देशासाठी फासावर चढणाऱ्या क्रांतिवीरांच्या मनातील ओजस्वी भाव व्यक्त करणारी 'क्रांतीचा जयजयकार' ही कविता म्हणजे भारतीय साहित्यविश्वातील एक अमरक्रांतीगीत होय. देशस्वातंत्र्यासाठी क्रांतीचा मार्ग अनुसरल्यामुळे इंग्रज सरकारने गुन्हेगार ठरवून हातापायात बेड्या ठोकत कैद केले. काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली, तरीही या भारत मातेच्या सुपुत्रांच्या मनात आवेश कायम आहे. कोणताही पश्चाताप आणि भीती नाही.  पोटात भुकेचे थैमान माजून पोटातील आतडी कुरतडू लागल्या तरीही त्याची अजिबात तमा नाही. रणांगणाच्या बलिदानापेक्षाही आपले हे मरण श्रेष्ठ असल्याचे त्यांना विलक्षण समाधान आहे. आपण मृत्युंजय असल्यामुळे कारागृहातील मरणाची भीती आपणास नसल्याचे ते सांगतात. क्रांतीचा मार्ग हा निखाऱ्याचा आणि खडतर असूनही आपण जाणीवपूर्वक तो मार्ग निवडला. आणि बेहोश होऊन या ध्येयाच्या मार्गावर धावत राहिलो. कधी क्षणाची उसंत घेतली नसल्यामुळे जीवनात कीर्तीचे आणि प्रीतीचे धागे बांधू शकलो नाही. डोळ्यासमोर एकच ध्येय आणि प्रत्येक पावलावर अंगारच होता. सरकारने फाशीची शिक्षा दिल्यामुळे भारत मातेला मुक्त करण्याचे आपले ध्येय या जन्मात पूर्ण होऊ शकले नाही याची तीव्र खंत मात्र त्यांच्या मनात आहे. आपल्या मनातील शेवटची खंत भारत मातेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या श्वासांनाच दूत बनवून वाऱ्यासोबत कारागृहा बाहेर पाठवतात आणि भारतमातेला उद्देशून म्हणतात,
"नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पोवाडे गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन अर्ध्य तुला ठरलो वेडेपीर
देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई, वेड्यांना आधार"१३
          देश स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी आमच्या सर्वस्वाची आहुती दिल्याने आम्ही जगाच्या नजरेत वेडेपीर ठरलो. तरी या वेड्यांना पुन्हा जन्म घेण्यासाठी भारतमातेने आपल्या कुशीचा आधार द्यावा अशी एकच मागणी ते करतात. क्रांतिवीरांनी भारत मातेला उद्देशून साधलेल्या या शेवटच्या संवादातून उच्च कोटीच्या राष्ट्रनिष्ठेचे उत्कट दर्शन घडते. आपल्या वीर पुत्रांचा अवेळी अंत पाहून अश्रू गाळणाऱ्या भारत मातेची हे क्रांतिवीर स्वतःच सांत्वन करतात आणि स्वातंत्र्याचा नवा आशावाद जागवतात. सरकार फासावर चढवल्यानंतर सरणावर आमच्या पेटलेल्या प्रेतातूनच उद्याचे भावी क्रांतीचे नेते जन्मास येतील आणि ते नक्कीच भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करतील असा विश्वास ते प्रकट करतात. 
             कुसुमाग्रजांच्या 'किनारा' या काव्यसंग्रहाचे लेखन १९४२ ते १९४८ च्या दरम्यान झाल्याने भारतीय जनमनात उचंबळून आलेल्या भावना यात अगदी सहजपणे प्रकटल्या. स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यानंतरच्या आपल्या मनातील समिश्र भावना कुसुमाग्रजांनी 'किनारा' या कवितेतून  व्यक्त केल्या. 'माझा हिंदुस्तान', 'जय भारता', 'तेजाकडे', 'साफल्य' इत्यादी कवितात स्वातंत्र्यप्राप्तीने उल्हासित झालेल्या मनाची आनंदविभोर प्रतिक्रिया उमटली आहे. 'अनामिकास' या कवितेत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राण वेचणाऱ्या अज्ञात स्वातंत्र्यसैनिकाप्रती कुसुमाग्रजांनी कृतज्ञता प्रकट केली आहे. "माझ्या भारताचा ध्वज । उभा अजिंक्य आकाशी । नव्या मनूचा प्रवास। याच्या मंगल प्रकाशी। माझ्या देशाच्या देवता। तुला सहस्त्र वंदन। तुझ्या रक्षण सेवेत । होवो कृतार्थ जीवन।।"१४ अशी शांत, निरामय राष्ट्रप्रेमाची स्निग्ध भावना 'मराठी माती' या काव्यसंग्रहातील 'ध्वजगीत' सारख्या कवितेत व्यक्त केली आहे. 
            वा.रा.कांत यांच्या कवितेतून जुलमी निजामी राजवटी विरुद्ध क्रांतीची भावना प्रकटली आहे. सावरकर आणि कवी गोविंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि काव्याचा वा.रा. कांत यांच्या कवितेवर गडद प्रभाव जाणवतो. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतीचे आवाहन ते करतात.
"क्रांतिदेवी ये विद्युच्चरणी
तव नयनीची ठिणगी उडवुनि
असंतोष पेटवी जनमनी
तव अग्निपंख नभी फडफडु दे "१५
  •         'अमरज्योत', 'विराट जागरण', 'जयकार', 'नवे वर्ष', 'सांडिता कुणास्तव रुधिर तरी', 'गाशिल का गान ?' इत्यादी कवितेतून क्रांतीदेविस कवी वा. रा. कांत यांनी आवाहन केले आहे. १९३३ ते १९४७ या कालखंडात वा.रा. कांतांनी जे काव्यलेखन केले त्यात मराठवाड्यातील जनतेने  निजामी अत्याचाराविरुद्ध दिलेल्या लढ्याचे चित्रण  आढळते. 'रुद्रवीणा' या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत श्री. प्रभाकर पाध्ये लिहितात "कविता म्हणजे कल्पनांचे पंख लावून फुलविलेला भव्य पिसारा नव्हे तर तो एक आत्महुतीचा आविष्कार असला पाहिजे, अशी कांतांची निष्ठा दिसते"१६  निजामी राजवटीत मराठवाड्यातील जनतेने केलेल्या संघर्षाचा वेध कवी वा.रा.कांत यांनी आपल्या कवितेतून घेतला आहे. उत्कट राष्ट्रभक्ती, भाषाप्रभुत्व आणि कल्पनाचातुर्यामुळे वा. रा.कांत यांच्या कविता अधिक परिणामकारक झाल्याचे दिसतात.  भारत मातेच्या अनेक वीरपुत्राच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य हे सार्थकी लागण्यासाठी या भूमीत पुढे समता, बंधुता सहिष्णुता, मूल्यनिष्ठा आणि उद्योगशीलता नांदावी अशी प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे' या गीतातून करतात. या गीतातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका अर्थाने स्वतंत्र भारताची सम्यक दिशा सूचित केली आहे.              
  •         भारतीय समाज देश स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारलेल्या काळामध्ये मराठी काव्यसृष्टीत राष्ट्रीय कवितेचा जन्म झाला.  कवी यशवंत आणि विनायक यांच्या एखाददुसऱ्या कवितेचा अपवाद सोडला तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कवितेची पायाभरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. राष्ट्रासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती द्यायला सिद्ध झालेल्या सावरकरांची राष्ट्रीय कविता म्हणजे एका अर्थाने त्यांच्या अनुभूतीचे बोल होते. राष्ट्राला आपले सर्वस्व मानून राष्ट्रसेवेतच सावरकरांनी आपल्या जीवनाची सार्थकता शोधली. सावरकरांचा काव्यआदर्श डोळ्यासमोर ठेवत स्वातंत्र्यकवि गोविंद यांनी जनमनात स्वातंत्र्यचेतना जागवण्यास्तव आपली काव्यप्रतिभा स्वातंत्र्य विषयाला वाहिली. स्वातंत्र्य कल्पना मूर्त रूपात उतरवण्यासाठी संघर्षाला सिद्ध झालेच पाहिजे, हा त्यांचा विचार स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने परिणामकारक ठरला. देश स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या मनातील जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचे दर्शन कवी कुंजविहारीच्या कवितेतून घडते. राष्ट्राप्रतीचा समर्पणभाव साने गुरुजींच्या अनेक कवितेतून पाहायला मिळतो. स्वातंत्र्यानंतरच्या बलसागर भारताचे सुंदर स्वप्न साने गुरुजींनी आपल्या कवितेतून रेखाटले आहे. भारत भूमीच्या पूर्व वैभवाची आठवण करून देऊन लोकांची अस्मिता जागवण्याचा प्रयत्न कवी अज्ञातवासीनी केला आहे. कवी यशवंत, कवी विनायक, वि. दा. सावरकर, स्वातंत्र्यकवि गोविंद, कुंजविहारी, साने गुरुजी यांच्या राष्ट्रीय कवितेतून जी राष्ट्रनिष्ठा प्रकटली त्याचा परमोच्यबिंदू कुसुमाग्रजांच्या कवितेत पाहायला मिळतो. कुसुमाग्रजांनी आपल्या क्रांतीचा जयजयकार या अमरक्रांतीगीतातून  राष्ट्रनिष्ठेचा एक उत्तुंग आदर्श भारतीय साहित्यसृष्टीत प्रस्थापित केला. कवी वा.रा. कांत यांनी आपल्या कवितेतून जुलमी निजामी सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी मराठवाड्यातील जनतेस प्रवृत्त केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मूल्याधिष्ठित समृद्ध भारत निर्माण व्हावा अशी प्रार्थना केली. आज भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या सर्वस्वाची आहुती दिलेल्या लाखो देशभक्तांच्या जाज्वल्यन राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. मिळालेल्या स्वराज्याचे स्वराज्य बनवण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे' या गीतातून केलेल्या प्रार्थनेच्या मार्गावर वाटचाल करण्याचा निर्धार करणे आज नितांत गरजेचे ठरते.
संदर्भ सूची :-

०१.  यशवंत : मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड सहावा, भाग दुसरा, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे प्रथमावृत्ती १९९१. पृ. २६.
०२.   विनायक : उदधृत, चित्रमयजगत १९३०, पृ.१८०.
०३. वि दा सावरकर : स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता, जनआवृत्ती, रिया पब्लिकेशन कोल्हापूर, दुसरी आवृत्ती २०१२. पृ.९३.
०४. तत्रैव  पृ.५५
०५. अक्षयकुमार काळे : अर्वाचीन मराठी कविता, पा.ना. बनहट्टी प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती १९९९.पृ .१४१.
०६. ना.दा सावरकर : श्री गोविंदाचा स्वातंत्र्याचा छंद, स्वातंत्र्यकवि गोविंद यांची कविता, अनुभव पब्लिकेशन मुंबई, प्रथमावृत्ती १९३०. पृ. १५९.
०७.  गोविंद : उनि, स्वातंत्र्यकवी गोविंद यांची कविता, पृ.२८४.
०८. तत्रैव, पृ.४५.
०९.  अक्षयकुमार काळे :  उनि, अर्वाचीन मराठी कविता, पृ. २१८.
१०. कुंजविहारी  : https://balbharatikavita.blogspot.com/2014/11/blog-post.html?m=1
११.साने गुरुजी :  उनि, अर्वाचीन मराठी कविता,  पृ.२२२.
१२. तत्रैव, पृ.२२२.
१३. कुसुमाग्रज : https://balbharatikavita.blogspot.com/2014/08/blog-post_3.html?m=1
१४.कुसुमाग्रज : उनि, अर्वाचीन मराठी कविता, पृ.३१०.
१५. वा. रा.कांत : उनि, अर्वाचीन मराठी कविता,  पृ.३२९.
१६. प्रभाकर पाध्य : उनि, अर्वाचीन मराठी कविता,  पृ.३२९.



                   Email ID :- rvbembare@gmail. com
                   Mob :-  ९४२०८१३१८५
















टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर

वारकरी संतकवयित्रीचे काव्यधन