संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर
जगाच्या इतिहासात प्लेटो आणि बुद्धांचा अपवाद सोडला, तर लोकशाही मूल्यांचा व्यापक विचार करून ती मूल्य आचरणात आणणारी पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा बसवेश्वर. ज्या काळात अमेरिका हा देश अस्तित्वात नव्हता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन रशिया या देशातूनही राजेशाहीचा उद्घोष होत होता. तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी येथे लोकशाही मूल्य रूजवण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल केली. या जगातील माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वांतत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सहिष्णुता, सत्य, अहिंसा या लोकशाही मूल्यांची मांडणी केली. या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी रचनात्मक अशी कल्याणक्रांती केली. राजेशाहीच्या काळात कुणाच्या ध्यानी मनीही संसदेची कल्पना नव्हती, तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी लोकशाही मूल्याचे अधिष्ठान देऊन अनुभव मंटपाची उभारणी केली. त्यांचे हे अनुभव मंटप म्हणजे प्रगल्भ संसदीय लोकशाहीचा या जगातला पहिला आविष्कार होता. बौद्ध धर्माचा अपवाद सोडला तर जगातील बहुतांश धर्म, पंथ कुठल्यातरी प्रेषित वा अवतारी पुरुषाने मांडलेल्या विचारातूनच आकाराला आली. या धर्माच्या जडणघडणी पासून सामान्य ...