संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर
बौद्ध धर्माचा अपवाद सोडला तर जगातील बहुतांश धर्म, पंथ कुठल्यातरी प्रेषित वा अवतारी पुरुषाने मांडलेल्या विचारातूनच आकाराला आली. या धर्माच्या जडणघडणी पासून सामान्य माणूस कोसोमैल लांबच होता. धर्म प्रवर्तक व प्रेषितांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानात काडीचाही बदल करण्याचा आधिकार कुणाला नव्हता. यातून धर्मावर मुठभर लोकांचीच मक्तेदारी प्रस्थापित झाली होती. या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यावर आधारित नवाधर्म आणि नवसमाजाची पायाभरणी करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाची स्थापना केली. ज्या कळात अस्पृश्य शूद्रांची सावली अंगावर पडल्यानंतर लोक वस्त्रासहित स्नान करीत होते. त्या काळात महात्मा बसवेश्वरांनी महार, मांग, ढोर, चांभार, वडार, डोंबारी यांच्यासह सर्व बलुतेदार,आलुतेदार आणि भटक्या विमुक्तांना अनुभव मंटपात एकत्र आणले. समाजाने नाकारलेल्या वेश्यांनाही या अनुभव मंटपाने स्वीकारून त्यांचे पुनर्वसन केले. सर्वानाच अभिव्यक्त होण्याचे समान स्वातंत्र्य दिले. ब्राह्मणापासून ते अंत्यजापर्यंत आणि राजा पासून ते भंग्यापर्यंत येथे सर्वांना समान अधिकार दिला. येथील प्रत्येक सदस्याला शरण म्हणूनच संबोधले जात असत.
सातशे सत्तर शरणांच्या एकमताने डोंबारी जातीतील अल्लम प्रभुंना या अनुभव मंटपाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. कोणतेही आरक्षण किंवा मतासाठी जातीय राजकारणाचे समीकरण नसतांना महात्मा बसवेश्वरांनी हे पाऊल उचलून प्रगल्भ संसदीय लोकशाही मूल्याचे दर्शन घडवले. महात्मा बसवेश्वर मात्र या अनुभव मंटपाचे सामान्य सदस्य बनले. मंत्री मधुवरस, पूर्वाश्रमीचा कश्मिरचा राजा महादेव भुपाल सारखे लोक या अनुभव मंटपाचे सदस्यत्व पत्करून सर्वसामान्याशी समरस झाले. ज्यांच्या कृती आणि उक्तीला विवेकाचे अधिष्ठान आहे अशा कृतिशील श्रमजिवी स्त्री पुरुषाचे हे अनुभव मंटप होते. ऐतखाऊ, कामचुकार, नीतीभ्रष्ट, व्याभिचारी अशा चारित्र्यहीन लोकांना कोणत्याही किमतीवर या अनुभव मंटपात प्रवेश नव्हता. आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विविध पक्षातील उमेदवारांची वाढती संख्या पाहिल्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या या अनुभव मंटपाची उंची नजरेत भरते.
सत्य, सदाचार,नीती आणि भक्तीच्या मार्गावर वाटचाल करताना जी अनुभूती आली किंवा मानवतेच्या उन्नयनाचा जो विचार सूचला त्याची अभिव्यक्ती अनुभव मंटपातून होत. प्रत्येक शरण आपला विचार वचन या काव्यछंदातून सादर करीत. त्यावर तेथे उपस्थित शरण सर्व बाजुनी चर्चा करून त्यात योग्य ती दुरुस्ती सूचवत. त्यानंतर अनुभव मंटपाचे अध्यक्ष अल्लम प्रभू हे सर्वसंमतीने त्या वचनास अंतिम मान्यता देत असत. आज संसदेत एखादे विधेयक मांडल्यानंतर ते पारीत करून त्याचे कायदयात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे. नेमकी तीच प्रकिया बाराव्या शतकात अनुभव मंटपात चालत होती. महात्मा बसवेश्वरांचे हे अनुभव मंटप म्हणजे एक आदर्श संसदेचे जगातील आद्य प्रारूपच होते. इ.स.१२१५ साली इंग्लंड मध्ये आकाराला आलेली मॅग्ना चार्टाची सनद ही संसदीय लोकशाहीचा आरंभबिंदू समजली जाते. पण या मॅग्नाचार्टाच्या पन्नास वर्षापूर्वी आपल्या देशात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित केला. अनुभव मंटप हे प्रजाप्रभुत्वाचा पुरस्कार करणारे हे जगातले पहिले धार्मिक विचारपीठ होते.
अनुभव मंटपातील शरणांनी माणसाला गुलाम बनवणाऱ्या सनातन रूढी, परंपरा स्पष्टपणे नाकारून मानवतेच्या उन्नयनांचा विचार प्राधान्याने केला. माणूस हाच सर्वश्रेष्ठ असल्याची भारतीय सविधानाची जी भूमिका आहे. त्याचा उदघोष बसवेश्वर आणि त्यांच्या शरणांनी बाराव्या शतकातच आपल्या वचनातून केला. गुलामगिरीचे वाहक ठरलेल्या सनातन रूढी परंपरा धिक्कारून स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांच्या या स्वातंत्र्य कल्पनेला नीती आणि विवेकाचे अधिष्ठान होते. या स्वातंत्र्याला स्वैराचाराचा स्पर्शही नव्हता. माणूस हा निसर्गतः जसा स्वतंत्र आहे तसाच तो समान आहे. महारवाडयाची आणि शिवालयाची जमीन जशी वेगळी नसते. शौच आणि अचमनाचे पाणी जसे निराळे नसते. तसे माणसामाणसात वर्ण आणि जातीवरून भेदभाव करता येत नसल्याचे बसवेश्वरांनी सांगितले. तसेच लिंगाच्या अधारे स्त्री पुरुषात केला जाणारा भेदभाव देखील त्यांनी स्पष्टपणे नाकारला. धर्मापासून कोसोमैल लांब असलेल्या, धर्माने नाकारलेल्या स्त्रियांना थेट धर्म निर्मितीच्या प्रक्रियेतच सहभागी करून घेतले. अनुभव मंटपात विविध स्तरातील ज्या सत्तर स्त्रिया होत्या. त्या सर्वांना चर्चेत सहभागी होऊन मत मांडण्याचा समान अधिकार होता. त्यामुळे बाराव्या शतकात लक्कमा, काळव्या, सत्यव्वा, संकव्वा सारख्या शूद्र कुळातील स्त्रिया मुक्तपणे व्यक्त झाल्या. यातून कन्नड वचन वाङ्मय समृद्ध झाले. लोकशाहीची जननी समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये अनेक चळवळी केल्यानंतर विसाव्या शतकात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. पण महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अनुभव मंटपात बाराव्या शतकातच स्त्रियांना मत मांडण्याचा अधिकार मिळवून दिला. लिंगभावाच्या पलिकडे जाऊन स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी दिली.
बसवेश्वरांच्या अनुभव मंटपात कुठल्याही काल्पनिक गोष्टीपेक्षा अनुभवातून सिद्ध झालेल्या वास्तव गोष्टीवरच चर्चा केली जात. येथे सामुहिक चर्चेतून संमत झालेले विचार सर्व शरण निष्ठेने आचरणात आणत असत. पोकळ तात्त्विक गप्पाना तेथे स्थान नव्हते. ‘आधी कृती मग उक्ती' असा अनुभव मंटपाचा दंडक होता. प्रचंड प्रतिकुल परिस्थितीत समतेचा विचार आचणात आणण्याचे धाडस या अनुभव मंटपातील शरणांनी दाखवले. बाराव्या शतकात हरळय्या चांभाराचा मुलगा शिलवंत व मधुवरस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी लावण्यवती यांचा आंतरजातीय विवाह अनुभव मंटपातील सर्व सदस्यांच्या समतीने घडवून आणला. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातला हा पहिला धर्ममान्य आंतरजातीय विवाह होता.
महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा केवळ उद्घोष न करता व्रतस्थपणे स्वतः लोकशाही मूल्य जगले. भारतीय संविधानात जो सामाजिक न्यायाचा विचार आहे. तोच विचार दासोह संकल्पनेतून मांडला. दासोह म्हणजे आपल्याकडील अतिरिक्त संपत्तीबद्दल मनात कोणताही मोह न ठेवता समाज हितासाठी त्या संपत्तीचा निरपेक्ष बुद्धिने विनीयोग करणे होय. बसवेश्वरांनी वचनातून शरणांच्या आचरणाचे जे सप्तसूत्र सांगितले. त्यात चोरी, हत्या, खोटे बोलणे, क्रोध, तिरस्कार, आत्मस्तुती, निंदा यागोष्टी कटाक्षाने सोडायला सांगितल्या. लोकशाहीच्या बळकटीसाठी बसवेश्वरांचे सप्तसूत्र महत्वाचे ठरते. स्वर्ग, नर्क, वैकुंठ, कैलास या असवैधानिक कल्पना नाकारून माणसाला सर्वोच्च मानले. आपल्या कृती उक्तीतील सत्य आणि सदाचारातून मानवी जीवन सुंदर आणि समृद्ध बनू शकते हा विश्वास दिला. महात्मा बसवेश्वरांच्या कृती आणि उक्तीतून लोकशाही मूल्यांची उपसनाच झाली आहे. म्हणून सांप्रदायिक नजरेतून महात्मा बसवेश्वराकडे न पाहता त्यांचे विचार अंगिकारून लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे आज गरजेचे ठरते.
डॉ. रवींद्र बेम्बरे
rvbembare@gmail.com
Mob-९४२०८१३१८५

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें