भारतीय संतांच्या भूमिकेतून वर्तमान अर्थचक्र



      कोरोना विषाणूने संपूर्ण जगाची झोप उडवली. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, पद, प्रतिष्ठा,कीर्ती या गोष्टी आज अर्थहीन ठरल्या. राजा पासून रंकापर्यंत सर्वांना जमिनीवर आणणारे हे संकट ठरले. अत्यावश्यक सेवांचा अपवाद सोडला तर संपूर्ण जग बंदिस्त करणारे हे संकट सर्वार्थाने अपूर्व आणि अविस्मरणीय आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी प्राणपणाने कोरोना विषाणू विरुद्ध लढत आहेत. ज्यांचे हातावर पोट आहेत, ते सर्व हवालदिल आहेत. उद्याच्या चिंतेने अनेकांची झोप उडाली. जगाचे सर्व प्रस्थापित अर्थिक समीकरणे मोडीत निघाली. कोरोना महामारीने बहुतांश देशाचा आर्थिक कणाच मोडला. यातून एक सार्वत्रिक हतबलता आली. शारीरिक आरोग्या प्रमाणेच आर्थिक आरोग्य सुधारण्याचे मोठे आव्हान आज अर्थशास्त्रज्ञा समोर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार  कोरोना महामारीचे  विक्राळ रूप अजून  पुढेच आहे. यामुळे उद्याची आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल अंदाज करणे देखील कठीण झाले आहे. अर्थतज्ञाकडून आज केवळ शक्यता वर्तवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर चिरंतन भारतीय संत साहित्यातून कोणता संदेश मिळतो याचा शोध घेण्याच्या दृष्टीने प्रस्तुत लेखन प्रपंच आहे. 
             कोरोना महामारीत आजारामुळे जेवढे लोक मरतील त्यापेक्षा जास्त लोक आर्थिक विवंचनेतून मरतील असा तज्ञांचा अंदाज आहे. कोरोनामुळे लोकांचे केवळ जिवच जाणार नाहीत; तर जिवंत राहिलेल्यांचे रोजगार मोठ्या संख्येने जाणार आहेत. एका औरंगाबाद शहरात मागील वीस दिवसात बेरोजगारीच्या नैराश्यातून अठरा लोकांनी आत्महत्या केली आहे. असे आत्महत्या करून प्रश्न सुटत नसून मागे राहिलेल्या लोकांसमोर प्रश्नाचा गुंता वाढतो.  आलेल्या परिस्थितीबद्दल उद्वेग न करता त्याचा स्वीकार करून धैर्याने सामोरे गेले पाहिजे असा संदेश भारतीय संत साहित्यातून व्यक्त झालेला आहे. आपला व्यवसाय रोजगार बंद पडला म्हणून नैराश्यात जावून आत्महत्या करण्यापेक्षा काळाची पावले ओळखत नवा रोजगार प्रत्येकाने शोधणे नितांत गरजेचे आहे. म्हणजे समाजाची गरज लक्षात घेवून आपला व्यवसाय बदलला पाहिजे. यासंदर्भात संत तुकारामांचा उपदेश अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. ते म्हणतात, 'पिकवावे धन । ज्याची आज तरी जन' हा उपदेश शेतकऱ्यांना उद्देशून असला, तरी आज ज्यांचे व्यवसाय बंद पडत आहेत त्या प्रत्येकाला एक नवी व्यावहारिक दृष्टी देणारा हा विचार आहे. 'जोडुनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।।' या अभंगात अर्थचक्राला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सिद्धांत संत तुकाराम मांडतात. प्रत्येकजन कौशल्याने आपला व्यवसाय करावा त्यातून संपत्ती अवश्य मिळवावी, पण त्या संपत्तीला चिकटून न बसता समाजाची गरज लक्षात घेवून अनासक्त वृतीने ती संपत्ती खर्च करावी. पैसा विनीयोगात आला तरच अर्थचक्रास गती प्राप्त होत असते, ही तुकारामांची भूमिका आहे. यासंदर्भात समर्थ रामदास आपल्या एका श्लोकात म्हणतात, 'जैसे व्यवहारिता धन। रासी माथां लाभे।।' धन एका ठिकाणी न साठवता ते फिरत राहिले तरच त्याची हळूहळू वृद्धी होते. त्यातूनच अर्थव्यवस्थेला बळकटी येत असल्याचे रामदास येथे सूचित करतात. काही लोक अहोरात्र पैशामागे धावून पैसा गोळा करतात, पण तो खर्च मात्र करत नाहीत. अशा लोकांचा पैसा हा निरर्थक ठरत असल्याचे कबीर आपल्या दोह्यात सांगतात. 'बहत जतन करि कीजिए। सब फल जात नसाय । कबिरा संचय सूप धन। अंत चोर ले जाय।।' पैसा खर्च करण्याचा पहिला मार्ग म्हणजे दान देणे आहे. दुसरा मार्ग कमावलेल्या पैशाचा उपभोग घेणे आहे. पण कंजूस माणूस दानही करत नाही आणि उपभोगही घेत नाही. शेवटी त्या पैशाचा नाश होतो. त्याच्या पश्चात हा पैसा चोरांच्या हाती लागतो, असे कबीर सांगतात.
            आज देशातील एकसष्ट टक्के संपत्ती केवळ एक टक्के लोकाकडे साचलेली आहे. ही आर्थिक दरी उत्तरोत्तर वाढत आहे. वर्तमान महामारीतून उदभवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीमंताकडे साचलेला अतिरिक्त पैसा विनियोगात येणे गरजेचे असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. हा विचार सतराव्या शतकात संत तुकारांमांनी 'आर्तभुता द्यावे दान। खरे पुण्य त्या नावे।।' अशा अभांगातून निराळ्या शैलीत मांडला होता. केवळ शाब्दिक संदेशावरच न थांबता आपली संपत्ती लोकांना वाटून कर्जखाते त्यांनी इंद्रायणीत बुडवले. संकटात संवेदनशीलता कशी जोपासावी याचा एक उच्च आदर्श तुकारामांनी जगासमोर प्रस्थापित केला. अतिरिक्त संपतीचा संचय ही समाजाची चोरी आणि पाप असल्याचे बसवेश्वर सांगतात. 'सोन्याचा एक कण, वस्त्राचा एक धागा जरी / आजच्यासाठी, उद्यासाठी पाहिजे म्हणालो /  तर तुमची शपथ, तुमच्या प्रमथांची शपथ' ही बसवेश्वरांची भूमिका या देशातले आजचे कुबेर काही अंशी जरी स्वीकारले तरी देश आर्थिक संकटातून निश्चित बाहेर पडेल. रुतलेले अर्थचक्र निश्चितच गतिमान होईल. दुष्काळात उपाशी पोटी झोपणाऱ्या चोरांच्या लेकरासाठी बसवेश्वर आपल्या पत्नीच्या अंगावरील दागिने काढून देतात. संपत्तीपेक्षा माणूस जोडणे आणि जपण्यावर बसवेश्वरांचा भर होता. सामाजिक स्नेहभाव जोपासण्याचा संदेश त्यांनी आपल्या अनेक वचनातून दिला. 
          आज कोरोना महामारीतील संकटात जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करून चढ्या दराने विक्री करणारे काही महाभाग दिसतात. यातले काही धार्मिकतेचा आव आणून वावरतात. अशा लोभी आणि दांभिक प्रवृत्तीचा बसवेश्वरांनी धिक्कार केला आहे. अनेक नफेखोर लोक टाळेबंदीत साठेबाजी करून  आज देशा समोरील समस्येत भर घालत आहेत. अशा संकटात आपल्या सभोवतीच्या लोकांना मदत करणे ही राष्ट्र सेवा आणि परमेश्वर पूजा ठरणार आहे.  'भाताचे एक शीत पाहता कावळा / हाक न मारी का आपल्या परिवारास ? /  घासभर अन्न दिसता कोंबडी, / न बोलवी का आपल्या कुलबांधवास ? ' या वचनातून कावळा कोंबड्या सारख्या पक्षा पासून तरी सामाजिक न्यायाचा धडा माणसाने घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बसवेश्वर करतात. अशा संकटातही आपलाच स्वार्थ साधणारे लोक बसवेश्वरांच्या दृष्टीने कावळा कोंबड्यापेक्षा हीन ठरतात. या भूतलावर स्वर्ग निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेला सर्वश्रेष्ट जीव म्हणून बसवेश्वरांनी माणसाकडे पाहिले आहे. करोना विषाणूमुळे आलेले संकट म्हणजे आपले मनुष्यत्व सिद्ध करण्याची कसोटीच आहे. स्वतःच्या संकुचित स्वार्था पलीकडे जावून प्रत्येकाने संतांचा सामाजिक स्नेहभाव जोपासला तर कोरोना महामारीत रुतलेले अर्थचक्र गतिमान व्हायला वेळ लागणार नाही.

डॉ.रवींद्र बेम्बरे
वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर
Email - rvbembare@gmail. com
                      Mob - 9420813185

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा - डॉ. रवींद्र बेम्बरे

संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर

वारकरी संतकवयित्रीचे काव्यधन