वारकरी संतकवयित्रीचे काव्यधन
जगाला समता आणि समन्वयशिलतेचा संदेश देण्यासाठी संत ज्ञानेश्वर नामदेवादी संतांनी तेराव्या शतकात वारकरी संप्रदायाची बांधणी केली. 'यारे यारे लहानथोर । भलते याती नारी नर।।' असा उद्घोष करीत सर्व भेदभावाच्या पलीकडे जाऊन माणूस जोडला. यामुळे विटाळाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्यापासून सर्वदृष्टीने वंचित आणि उपेक्षित राहिलेल्या स्त्रीला परमार्थाचा अधिकार मिळाला. यामुळे वारकरी संप्रदायात संतकवयित्री मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संतकवयित्रीची एक समृद्ध परंपरा निर्माण झाली. आपली अध्यात्मिक अनुभूती आणि विचारांची अभिव्यक्ती यांनी अभंग छंदातून केली. स्त्रीसुलभ भावनांच्या उत्कट अभिव्यक्तीतून त्यांच्या अभंगवाणीला भावकवितेचे सौंदर्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यातून प्रकट झालेल्या विचारातून वैचारिक उंचीचे दर्शन घडते.
ज्ञानेश्वरादी भावंडात सर्वात लहान असूनही उच्च कोटीच्या प्रगल्भतेचा आदर्श मुक्ताबाईंनी जगासमोर प्रस्थापित केला. मुक्ताबाईचे त्रेसष्ठ अभंग उपलब्ध आहेत. वारकरी संप्रदायात सर्वमान्य असलेल्या संतत्वाचा पहिला उच्चार मुक्ताबाईंनी केला. हेच संतत्व पुढे ज्ञानेश्वरीतून प्रकटले आहे. उद्विग्न होऊन मनाची ताटी मिटून बसलेल्या ज्ञानेश्वरांना जगाचा अपराध पोटात घेत जगाशी समरस होण्याची विनंती मुक्ताबाईनी आपल्या ताटीच्या अभंगातून केली. 'संत जेणे व्हावे । जग बोलणे सोसावे । तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान । थोरपण जेथे वसे । तेथे भूतदया असे । रागे भरावे कवनाशी। आपण ब्रह्म सर्व देशी । ऐसी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।' जगातील सर्व अज्ञजनांचे अपराध पोटात घेऊन जगाचा उद्धार करण्याचे उत्तरदायित्व संतांनी स्वीकारले पाहिजे. ज्यांच्या मनातील मोठेपणाच्या अहंकाराचे विसर्जन झाले, तोच संत असल्याचे मुक्ताबाई येथे सांगते. संतांच्या हृदयात सकल भुतमात्राबद्दल दयाभाव असलाच पाहिजे. जगातील चराचरात ब्रह्म पाहण्याची दृष्टी जर संताची असेल, तर कुणावर रागवण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
लोकांचा अपराध पोटात घेणे हेच संतत्वाचे मुख्य लक्षण असल्याचे मुक्ताबाई सांगते. 'योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा । विश्व रागे झाले वन्ही। संत सुखे व्हावे पाणी । शब्द शास्त्र झाले क्लेश। संती मानावा उपदेश। विश्व पट परब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।' रागाने जग आग बनले तर ती आग विझवण्यासाठी संतांची पाणी होण्याची तयारी ठेवावी. जननिंदा ऐकून व्यथित न होता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. निंदेतूनही उपदेश मिळवण्याची क्षमता संताकडे असली पाहिजे. आपल्या कृती आणि उक्तीतून क्षमा, दया आणि शांतीचा आदर्श संतांनी समाजासमोर प्रस्थापित करावा. 'संत तोची जगी । क्षमा दया ज्याचे अंगी।।' असे मुक्ताबाई सांगतात. आपल्या सदगुणांचा आणि संतत्वाचा अहंकार बाळगणे मुक्ताबाईना मान्य नाही. 'एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।' असा अहंकार संतांनी कटाक्षाने टाळला पाहिजे, अशी भूमिका मुक्ताबाईंनी मांडली. संताबद्दल मांडलेले चिंतन अत्यंत उच्च कोटीचे असून त्यातून मुक्ताबाईच्या वैचारिक उंचीचे दर्शन घडते.
परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. परमेश्वर सगुण साकार असल्याची काही लोकांची श्रद्धा आहे, तर परमेश्वराचे सगुण रूप नाकारून तो निर्गुण निराकार असल्याचे काही लोक सांगतात. मुक्ताबाई मात्र आपल्या अभंगातून एकाच परमेश्वराच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपाचे एकत्रित वर्णन करते. मुक्ताबाईचा केशिराज हा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. 'निर्गुणाची सेज सगुणाची बाज। तेथें केशीराज पहुडले।। कैसे याचे करणें दिवसां चांदिणे। सावळें उठणें एका तत्त्वे ।। नाहीं या ममता अवघीच समता। आदि अंतु बिंबता नलगे वेळू।।' निर्गुणाचे अंथरूण आणि सगुणाचे बाज असून त्यावर आपला केशिराज झोपलेला आहे. म्हणजेच तो सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात आहे असे मुक्ताबाई सांगते. हा केशिराज कुठल्या रूढ चौकटीत सामावणारा नाही, तर तो अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकतो. दिवसा चांदणेही तो दाखवतो. कुणा एकापुरती त्याची ममता सीमित नसून अवघ्या भूतमात्राबद्दल त्याच्या मनात समत्वभाव असल्याचे मुक्ताबाई सांगते. म्हणजेच मुक्ताबाईचा केशिराज हा समतेचा संदेश देणारा आहे.
मुक्ताबाईचा परमेश्वर विषयक दृष्टीकोण हा विवेकनिष्ठ आहे. परमेश्वराच्या दर्शनासाठी घरदार, उद्योग व्यवसाय सोडून तीर्थयात्रेचे निमित्ताने भटकंती करणे मुक्ताबाईंना पसंत नाही. विवेकाने विचार न करता तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांना मुक्ताबाईंनी वेडी संबोधले आहे. 'मातीची भिंताडे चालविती मढे | सांडोनिया वेडी तीर्था जाती | आहे याच देही शोधुनिया पाही | प्रेता ठाव नाही तयावीण ||' देव आपल्या देहातच असल्याने तीर्थयात्रेची गरज नाही असे मुक्ताबाईना वाटते. मुक्ताबाईचा हा दृष्टिकोण महात्मा बसवेश्वरांच्या 'देह हेच देवालय' या विचाराच्या जवळ जाणारा आहे. वेदातील ज्या गोष्टी आपल्या विवेकाला तर्काला पटत नाहीत, त्या गोष्टी मुक्ताबाई ठामपणे नाकारते. वेदांची चिकित्सा करण्याचे धैर्य ही मुक्ताबाई दाखवते. वेदाच्या मते केवळ तीर्थक्षेत्री देव आहे, तर जगात इतरत्र कोण आहे ? तो इतरत्र नाहीसा झाला का ? असा मार्मिक प्रश्न ती उपस्थित करते. 'वेदाचीये मते तीर्थी देव आहे | देशोदेशी काय उणा झाला | अष्टोत्तरशत तीर्थे जयाच्या भीतरी | तो तुझे अंतरी आत्माराम | मुक्ताबाई म्हणे झकविले दर्शन | दिवसा नागवण नागविती ||' एकशे आठ प्रकारच्या तीर्थक्षेत्री असलेली दैवते ज्यात सामावली आहेत, तोच देव आपल्या अंतरंगात असल्याचा आत्मविश्वास मुक्ताबाई प्रकट करते. यामुळे तीर्थक्षेत्री जाणे तिला निरर्थक वाटते. तीर्थक्षेत्री देव भेटत नसून दिवसाढवळ्या केवळ आपली लुबाडणूक होते, असे निरीक्षण मुक्ताबाई नोंदवते. विसाव्या शतकात आगरकर, लोकहितवादी, प्रबोधनकार ठाकरे, नरेंद्र दाभोळकर अशा पुरोगामी विचारवंतांनी जो परमेश्वर विषयक विचार मांडला त्या विचारांचा पहिला सूतोवाच मुक्ताबाईंनी आपल्या अभंगातून केला असे म्हणायला हरकत नाही.
मराठी संत साहित्यामध्ये मुक्ताबाईची कुटरचना लक्षणीय आहे. कुटरचना म्हणजे केवळ दुर्बोध कविता नव्हे. कुटरचना करण्यासाठी कवीकडे उच्च कोटींची प्रतिभा असणे आवश्यक असते. उच्च कोटीच्या प्रतिभेचा विलास म्हणजे कुटरचना असते. म्हणून ही रचना समजण्यासाठी देखील रसिकांकडे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असणे गरजेचे असते. योग सामर्थ्याबद्दल केल्या जाणाऱ्या अवास्तव दाव्याबद्दल मुक्ताबाई आपल्या कुटरचनेतून भाष्य करते. 'मुंगी उडाली आकाशी | तिणे गिळिले सूर्याशी | थोर नवलाव जाहला | वांझे पुत्र प्रसवला || विंचु पाताळाशी जाय | शेष माथा वंदी पाय | माशी व्याली घार झाली | देखोन मुक्ताई हासली ||' भाबड्या श्रद्धेतून कुठल्या गोष्टीकडे न पाहता मुक्ताबाई विवेकाने त्याची चिकित्सा करते. अतिशयोक्त, अवास्तव गोष्टीकडे पाहून मुक्ताबाई हसल्याचे येथे सांगते. प्रतिभावंत, प्रगल्भ आणि चिंतनशील अशा संतुलित मनाचा सहजाविष्कार म्हणजे मुक्ताबाईची अभंगवाणी आहे. यामुळे मुक्ताबाईच्या अभंगातील एकएक चरण सुभाषित होऊन लोकमनात स्थिरावले आहेत.
'संत वाटिकेतील जाईची वेल' म्हणून मराठी संतपरंपरेत संतकवयित्री जनाबाईंचा गौरव करण्यात आला. संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करत असताना नामदेवांच्या सहवासात तिला विठ्ठलभक्तीचा छंद जडला. आपली पारमार्थिक साधना करून संतत्वापर्यंत वाटचाल केली. संत जनाबाईच्या अभंगातून निर्भय, धाडसी, कणखर आणि कनवाळू मनाचा सहजाविष्कार झालेला आहे. तेराव्या शतकात ती स्त्री स्वातंत्र्याचा विचार बेधडकपणे मांडते. 'डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी।' या अभंगातून जनाबाईंनी स्त्रीस्वातंत्र्याचा उद्घोष केला आहे. डोक्यावरचा पदर जरी खांद्यावर आला तरी, मी भरल्या बाजारात जाईन. कोणालाच घाबरणार नाही. मला जनरीतीची पर्वा किंवा भीती नाही. हातात टाळ घेईन, खांद्यावर वीणा घेईन मग मला कोण मनाई करणार ? मी पंढरीच्या पेठेत पाल मांडलेली दिसेल, तेव्हा माझी ही कृती आणि माझे स्वातंत्र्य ज्यांना सहन होत नाही, त्यांनी खुशाल मनगटावर तेल घालून बोंबला किंवा ओरडा मला त्याची अजिबात पर्वा नाही, असे जनाबाई म्हणते. तेराव्या शतकात जनाबाईंनी आपल्या अभंगातून अशा रीतीने मांडलेले चिंतन म्हणजे स्त्रीस्वातंत्र्याचा वारकरी साहित्यातील हा पहिला उद्घोष आहे.
स्त्रीकडे पाहण्याची जी सनातन मानसिकता आहे, त्याला जनाबाई धुडकावून लावते. स्त्री जन्माबद्दल खंत का करायची ? असा प्रश्न ती उपस्थित करते. 'स्त्री जन्म म्हणुनी का व्हावे उदास । साधुसंता ऐसे केले जनी।।' आपल्या वाट्याला स्त्रीचा जन्म आला म्हणून आपण उदास आणि निराश होऊ नये. असेच साधुसंतांनी सांगितले असल्याचे प्रमाण जनाबाई देते. स्त्री जन्माकडे नकारात्मक नजरेतून न पाहता सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी जनाबाईच्या या अभंगातून मिळते. स्त्रीजातीचे मनोधैर्य उंचावून तिच्या मनातला आशावाद जागवण्याचा प्रयत्न जनाबाई करते. आपल्या अभंगातून जनाबाईंनी वारकरी संत परंपरेतील समत्वभावाचे दर्शन घडवले आहे. जनाबाईचा विठ्ठल हादेखील समता आणि ममतेचा प्रतीक आहे, याचा प्रत्येय 'विठु माझा लेकुरवाळा। संगे लेकुरांचा मेळा।।' या अभंगातून येतो. विठ्ठल हा जनाबाईच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू आहे. जनाबाईच्या अभंगातून विठ्ठलाबद्दलची जवळीकता आणि त्याच्यावरील अधिकार स्पष्ट होतो. 'अरे विठ्या अरे विठ्या । मुळ मायेच्या कारट्या । तुझी रांड रंडकी झाली । जन्म सावित्री चुडा ल्याली। तुझे गेले मढे । त्याला पाहून काळ रडे। उभे राहुनी अंगणी । शिव्या देतसे दासी जनीं ।।' या अभंगात विठ्ठलास मायेच्या कारट्या म्हणून शिव्या देत त्याचा उद्धार करते. जनाबाई विठ्ठलाला मागे शिव्या देत नाही तर थेट त्याच्याच अंगणात उभी राहून त्याला शिव्या देते. 'धरिला पंढरीचा चोर । गळा बांधुनिया दोर।।' या अभंगात भक्तांचे हृदय चोरणाऱ्या विठ्ठलास पकडून आपल्या हृदयात कोंडल्याचे जनाबाई सांगते. अशाप्रकारे जनाबाईची अभंगवाणी म्हणजे तिच्या समृद्ध भावविश्वाची नितांत सुंदर लेणीच आहे.
संत चोखामेळा या वारकरी संतांची धर्मपत्नी म्हणजे संत कवयित्री सोयराबाई होय. अत्यंत निष्ठेने आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत हीने पारमार्थिक जीवनाची वाटचाल केली. सोयराबाईबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, केवळ बासष्ट अभंग सकलसंतवाणी मध्ये उपलब्ध आहेत. यातून सोयराबाईचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व प्रकट झाले आहे. पती चोखामेळा यांनी जो परमार्थाचा मार्ग अनुसरला तोच मार्ग सोयराबाईंनी निष्ठेने अनुसरला. पतीच्या ध्येयाला आपले ध्येय समजून व्रतस्थपणे जीवनाची वाटचाल केली. आपल्या अभंगातील नाममुद्रेत स्वतःचा नामोल्लेख न करता 'म्हणतसे चोखियाची महारी' असा उल्लेख ती करते. यातून तिची पतीप्रतिची समर्पणशीलता आणि दृढनिष्ठा पाहायला मिळते. कुटुंबातील इतर नातेसंबंधही तितक्यात जिव्हाळ्याने ती जोपासते. चोखामेळाच्या कुटुंबाला अस्पृश्यत्व आणि दारिद्र्याचे तीव्र चटके सहन करावे लागले. यासंबंधीच्या जाणिवा तिच्या काही अभंगातून व्यक्त झालेल्या आहेत. सोयराबाई अस्पृश्यता आणि दारिद्र्याचे भांडवल करत बसण्यापेक्षा त्यावर मात करून विठोबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. स्वत:कडे ज्या गोष्टी नाहीत, त्या गोष्टीबद्दल रडत कुडत बसण्यापेक्षा आपल्या जवळ जे आहे त्याकडे सकारात्मक नजरेने पाहून त्यातून ती मार्ग काढते.
तेराव्या शतकात अस्पृश्यतेमुळे चोखामेळाच्या कुटुंबातील कुणालाही विठोबाच्या मंदिरात पाऊल ठेवता येत नाही. असे असले तरीही आपल्या भक्तीच्या बळावर प्रत्यक्ष विठोबाच आपल्या घरी स्वतः चालू येईल येईल असा तिचा ठाम विश्वास होता. शेवटी सोयराबाईच्या मनातील भक्ती पाहून विठोबास सोयराबाईच्या घरी यावे लागले. विठोबा दारात आल्यानंतर सोयराबाईला जी समतेची, अद्वैताची अनुभूती आली त्याचे दर्शन अभंगातून घडते. 'अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग । मी तूं पण गेलें वायां। पाहता पंढरीच्या राया। नाही भेदाचे तें काम । पळून गेले क्रोध काम। देही असोली तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही। पाहते पाहणे गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी।।' या अभंगातील रंग हा शब्द येथील विविध भेदभाव आणि विषमतेला अनुसरून सोयराबाईंनी वापरला आहे. सोयरबाईचा विठोबा समतेचा, ममतेचा आणि भक्तीप्रेमाचा प्रतीक आहे. सर्व प्रकारच्या भेदभावाला विसरून विठोबा आपल्या जीवनात रमला आणि रंगला. आपणही त्या विठोबासी तादात्म्य पावलो. संत कबीराच्या शब्दात सांगायचे तर 'लाली देखन मै चली तो मै भी हो गई लाल' अशी अवस्था झाली. जगातील सर्व प्रकारचे भेदभाव मीटून समतेची आणि ममतेची अनुभूती आल्याचे सोयराबाई येथे सांगते. विठोबा हा सर्व भेदभाव मिटवून विश्वातील सर्व भूतमात्रांना जोडणारा, सर्व जीवांचा उद्धारक असल्यामुळे त्याच्या सानिध्यात मी तू पणा नाहीसा होऊन विश्वातील चराचराशी तादात्म्य पावल्याची अनुभूती आली. मनातला अहंकार गळाला, विठ्ठल दर्शनाने अंतरंग शुद्ध झाले.
काम क्रोधादी विकाराचा अंत होऊन संतत्वाकडे सहजपणे वाटचाल झाली. याची देही याची डोळा मुक्तीची अनुभूती आली. यानंतर सोयराबाईंना सर्व प्रकारचे विटाळ हे निरर्थक वाटते, म्हणून ती आपल्या अभंगात म्हणते, 'देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध। देहीचा विटाळ देहीच जन्मला। सोवळा तो झाला कवण धर्म। विटाळा वाचोंनी उत्पत्तीचे स्थान। कोण देह निर्माण नाही जगी। म्हणूनी पांडुरंगा वानितसे थोरी । विटाळ देहांतरी वसतसे । देहाचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणतसे महारी चोखियाची।।' विटाळामुळेच स्त्रीला शूद्रा प्रमाणे परमार्थापासून वंचित ठेवण्यात आले. महात्मा बसवेश्वरांनी विटाळाच्या आधारे स्त्रीची केली जाणारी उपेक्षा थांबवली. महात्मा बसवेश्वरांच्या कारकिर्दीचा आरंभच मंगळवेढ्यातून झाला. त्यांच्या बासष्ट वर्षाच्या आयुष्यात एकवीस वर्ष ते मंगळवेढा येथे होते. याच भूमीत पुढे चोखामेळा, सोयराबाई, कर्ममेळा, निर्मळा, कान्होपात्रा, दामाजीपंत निर्माण झाले. बसवेश्वरांचे पुरोगामी विचार सोयराबाईच्या अभंगातून प्रतिध्वनीत झालेले आहेत. विटाळ हा देहाचा धर्म असला तरी आत्मा मात्र शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. यामुळे देहाच्या विटाळावरून कोणालाही निषिद्ध मानता येत नाही. स्त्री देहातील विटाळामुळे हिंदू धर्मशास्त्रात स्त्रियांना धर्म उपासनेचा अधिकार नाकारण्यात आला. गुणवत्तेला मारण्यात आले. सोयराबाईंनी मात्र आपल्या अभंगातून विटाळ संकल्पनेची निरर्थकता स्पष्ट करून स्त्रीचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. सनातन परंपरने नाकारलेल्या उपेक्षित भारतीय स्त्रीचा आत्मविश्वास सोयराबाईनी जागवला. ज्या लोकांनी विटाळाला निषिद्ध मांनले, त्यांचाही जन्म विटाळातून झाला. जगातील सर्व संत-महात्मे आणि महापुरुषांचा जन्म विटाळातून झाला. म्हणूनच देहाच्या निसर्गदत्त विटाळावरून माणसामाणसात कोणताही भेदभाव करता येत नसल्याचे सोयराबाईंनी येथे सांगितले. अशाप्रकारे सोयराबाईच्या अभंगातून परिवर्तनवादी आणि पुरोगामी अशा विवेकी विचाराचे दर्शन घडते.
संत चोखामेळाचा सर्व गोतावळा विठ्ठलमय झाला होता. संतकवयित्री निर्मळा संत चोखामेळाची बहिण, बंका महारांची पत्नी आणि संतकवयित्री सोयराबाईची नणंद आहे. निर्मळाचे श्रीसकलसंतवाणी मध्ये चोवीस अभंग आज उपलब्ध आहेत. खरे सुख संसारात नसून ते परमार्थातच असल्याची अनुभूती निर्मळांनी आपल्या अभंगातून व्यक्त केली आहे. परमेश्वर उपासनेच्या अनेकविध साधनांपैकी नामस्मरण हे साधन अधिक महत्त्वाचे आणि सुलभ असल्याचे ती वारंवार सांगते. हरीनामाची गोडी लागण्यासाठी पूर्वजन्मीचे सुकृत असणे गरजेचे आहे असे ती म्हणते. 'अनंत जन्माचे सुकृत पदरीं। तोचि उच्चारी हरिनाम।।' या अभंगातून हरीनामाचा महिमा निर्मळांनी विस्ताराने सांगितला आहे. परमार्थ कशाला म्हणावे? हे विशद करत असताना आपल्या अभंगातून निर्मळांनी मूल्यविचाराची मांडणीच केली आहे. कुणाची निंदा करणे, दोष प्रकट करणे, स्वार्थासाठी स्तुती करणे या गोष्टी परमार्थात वर्ज्यच असल्याची भूमिका निर्मळाची आहे. याहीपुढे जाऊन ती म्हणते, 'परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ । मानावा आढळ परमार्थी। निर्मळा म्हणे हाची परमार्थ। संतांचा सांगात दिननिशी ।।' दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचे फुकटचे अन्न आणि परस्त्री या गोष्टींचा परमार्थ साधकांनी विटाळच मानला पाहिजे. सदगुणांचा अंगिकार करण्यासाठी सतत रात्रंदिवस संतांच्या संगती मध्ये राहणे म्हणजे परमार्थ असेही ती येथे सांगते.
कान्होपात्रा ही मंगळवेढ्यातील शामा नायकिनीची मुलगी होती. दिसायला देखणी असल्यामुळे आईप्रमाणे ती एक नायकीनच बनावी अशी प्रस्थापित समाजाची रास्त अपेक्षा होती. परंतु कान्होपात्रा मात्र या अमानवी परंपरेला छेद देते. सनातन मानसिकते विरुद्ध बंड करून परमार्थाकडे वळते. स्वतःला विठ्ठल चरणी अर्पित करते. त्यातूनच तिच्या जीवनात असंख्य संकटे उद्भवतात. या संकटातून स्वतःस वाचवण्यासाठी ती वेळोवेळी विठ्ठलाकडे धावा करते. थेट विठ्ठलाच्या सामर्थ्यालाच आव्हान करते.'पतितपावन म्हणविसी आधी। तरी का उपाधी भक्तामागे। तुझे म्हणवितां दुजे अंगसंग । उणेपणा सांग कोणाकडे। सिंहाचे भातुकें जंबुक पै नेता। थोरांचिया माथा लाज वाटे। म्हणे कान्होपात्रा देहसमर्पणें। करावा जातना ब्रिदासाठी ।।' तू पतितांचा उद्धारकर्ता असूनही तुझ्याच भक्तामागे संकटे का ? असा सवाल ती करते. हा देह मी तुला अर्पण केल्यानंतर त्याचा दुसऱ्यांनी उपभोग घेणे यात नामुष्की कोणाची आहे ? सिंहाचे भक्ष्य जर कोल्ह्याने पळवले तर ही गोष्ट सिंहासाठी अपमानास्पद आहे. मी तुला अर्पित असल्यामुळे दुष्टा पासून माझ्या देहाचे रक्षण करणे हे तुझेच उत्तरदायित्व आहे, असे कान्होपात्रा येथे म्हणते. 'नको देव रे अंत आता पाहू' या अभंगातील कारुण्य वाचकांचे काळीज हेलावून सोडणारे आहे. कान्होपात्रेचे आज केवळ सव्वीस अभंग उपलब्ध आहेत.
संत तुकारामशिष्या बहिणाबाई सिऊरकर सतराव्या शतकातील एक महत्त्वपूर्ण संत कवयित्री आहेत. श्रीसकलसंतवाणी मध्ये बहिणाबाईचे केवळ बत्तीस अभंग आज उपलब्ध आहेत. ब्राह्मण जातीतील बहिणाबाई शूद्र तुकारामांचे शिष्यत्व पत्करल्यामुळे अनेक स्तरावर बहिणाबाईचा छळ झाला. पतीची पुरुषप्रधान मानसिकता, वर्ण श्रेष्ठत्वाचा अहंकार यातून कुटुंबात पदोपदी तिचा छळच झाला. देहू येथील मंबाजी सारख्या सनातन्यांनी तिच्या छळात भरच घातला. या सर्वस्त्रावरील छळाने उद्विग्न न होता संयमाने आपल्या मार्गावर वाटचाल केली. तरीही स्रीजीवनातील पराधीनतेबद्दलची खंत त्यांच्या अभंगातून प्रकटली आहे. 'स्त्रियेचें शरीर पराधीन देह । न चाले उपाव विरक्तीचा।। शरीराचे भोग वाटताती वैरी। माझी कोण करी चिंता आता।।' स्त्री देहाच्या मर्यादांमुळे विरक्ती घेता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. 'ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीला देवालया।।' या अभंगातून वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षाचा आलेखच बहिणाबाईंनी मांडला आहे. एकंदर वारकरी संतकवयित्रीच्या अभंगातून व्यापक सहानुभाव, समर्पणभाव, संवेदनशीलता, उत्कटता, अनुभवसमृद्धी, वैचारिकता, उच्च कोटींची प्रगल्भता, अंत:करणाची विशालता या गोष्टीचा पदोपदी प्रत्येय येतो. वारकरी संत कवयित्रींची कविता वैचारिक समृद्धीचे दर्शन घडवते. या संत कवयित्रींच्या कवितेने वारकरी संप्रदायाला एक भावबळ विचारबळ मिळाले आहे. या संत कवयित्रीच्या योगदानातून वारकरी संप्रदाय अधिकाधिक समृद्ध होत गेला.
डॉ.रवींद्र वैजनाथराव बेम्बरे
प्रमुख, मराठी विभाग,
वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर
rvbembare@ gmail.com
9420813185

बारकाव्यासह मांडणी केली आहे. अभिनंदन सर.
जवाब देंहटाएंसुंदर लेखन,अभिनंदन सर.
जवाब देंहटाएंछानच
जवाब देंहटाएंखूप सुंदर ..समर्पक ..संत कवयित्रीचे योगदान अनमोल आहे .
जवाब देंहटाएंभावार्थ टिपणी परंतु गुह्यार्थ नाही.
जवाब देंहटाएं