वर्तमान नैसर्गिक आपत्तीत भारतीय संतांचे उदगार

                                                     वर्तमान नैसर्गिक आपत्तीत भारतीय संतांचे उदगार    


            भारतीय संत साहित्य म्हणजे शाश्वत सत्याचा एक व्रतस्थपणे घेतलेला शोध आहे.  ते कालनिरपेक्ष असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट संकटाचे संदर्भ त्यात सापडत नाहीत. काही संतांनी ढोबळ मानाने संकटाचे तीन प्रकार सांगितले आहेत.  दैविक संकट, दैहिक संकट आणि  भौतिक संकट असे ते तीन प्रकार आहेत. आज आपल्या समोर उभे असलेले कोरोना महामारीचे संकट देहावरचे असल्यामुळे ते दैहिक संकट ठरते. भूकंप, महापूर, वादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींचा समावेश भौतिक संकटात होतो. मानवाच्या उत्पत्तीपासून संकट हे त्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग राहिले आहे. म्हणून आज आपल्यासमोर आलेले करोना महामारीचे संकट पहिले आणि शेवटचे नाही. अशी कोणती ना कोणती आपत्ती सतत माणसासमोर आव्हान उभे करीत असते. 'शरीर काळाचे भातुके तुम्ही नेणा का इतुके।।' मानवाचे शरीर कळीकाळाच्या हातातील बाहुले असल्याचे संत नामदेव सांगतात. आपले जीवन म्हणजे सापाच्या सावली वास्तव्य  करणाऱ्या बेडका सारखे असल्याचे महात्मा बसवेश्वर आपल्या वाचनातून नमूद करतात. शिवयोगी ्मथ स्वामी  'सर्प जाभाडीचा बेडूक आवडी। मक्षिका सावडी जैशापरी।।' या अभंगात माशीची शिकार करण्यासाठी धडपडणाऱ्या सापाच्या जबड्यातील बेडकासारखी माणसाची अवस्था असल्याचे सांगतात. 'कोण दिवस येईल कैसा। नाही देहाचा भरवसा।। नाशिवंत हे शरिर। बहू रोगाचे माहेर।। काय ठुमकशी बापा। काळ बैसलासे मापा।।' असे लक्ष्मण महाराज ष्टीकर म्हणतात.    

          दुःख आणि मृत्यूच्या भीतीपोटी माणूस संकटाची धास्ती घेतो. म्हणून संतांनी दुःख आणि मृत्यूची अपरिहार्यता अग्रक्रमानी प्रतिपादित केली. 'सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे।।' या अभंगात जीवनातील अटळ  दुःखाचा स्वीकार करून विवेकाने जीवनाची वाटचाल करण्याचा संदेश संत तुकाराम देतात. जगातील वीस बावीस लाख जीवांपैकी वर्तमान, भूत आणि भविष्याचा विचार केवळ माणूसच करतो म्हणून त्याला सतत मरणाची भीती वाटत असते. कोणत्याही संकटात त्याला आपला मृत्यूच दिसू लागतो. माणसाच्या मनातील ही मृत्यूची भीती गेली तर कोणत्याही संकटाची धास्ती वाटणार नाही अशी संताची भूमिका आहे. म्हणून मरणाची भीती मारण्याचा प्रयत्न संत करतात. 'मरण माझे मरूनी गेले मज केले अमर।।' आपली मरणाची भीतीच मेल्यानंतर आपण अमर ठरल्याची अनुभूती संत तुकाराम मांडतात. 'आपले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम।।' मरणाची भीती मरणे तुकारामांच्या दृष्टीने आनंदाचा अनुपम सोहळा ठरतो. आपले उद्याचे मरण आजच यावे, अशी मागणी बसवेश्वर आपल्या वाचनातून करतात. बसवेश्वरांच्या प्रभावळीतील मराठी संत लक्ष्मण महाराज अष्टीकर आपल्या अभंगात म्हणतात, 'मरणा भेणे भीती आम्हा मरणाचा उत्सव।' मरणाची भीतीच नाहीशी झाल्यामुळे त्यांना मरणाचा उत्सव वाटतो. 'मरणभय ज्याचे चित्ता जय पावे सर्वथा।।'  या पदातून ज्याच्या मनात सदैव मृत्यूची भीती असते तो कदापि विजयी होऊ शकत नाही, असे संत एकनाथ सांगतात.

             मरणाच्या भीतीने संकटापासून लांब पळता सर्व तयारीनिशी त्याला सामोरे गेले पाहिजे ही संतांची स्पष्ट भूमिका आहे. संकटकाळात पलायनापेक्षा प्रयत्नाचा मार्ग अनुसरण्याचा संदेश भारतीय संतांनी दिला. आपत्ती ही तिथी सांगून येत नसते म्हणून तिचा सामना करण्यासाठी सदैव सिद्ध असले पाहिजे. आज कोरोना महामारी आल्यानंतर पायाभूत  वैद्यकीय  सुविधांची उभारणी करण्यासाठी आपली जी केविलवाणी धडपड चालू आहे ते पाहिल्यानंतर  ज्ञानेश्वरीच्या  तेराव्या अध्यायातील 'जो जळता घरी सापडे तो मग पवाडे कुहा णो।।' ही ओवी प्रासंगिक ठरते. जळत्या घरात सापडल्यानंतर ती आग विझवण्यासाठी तेंव्हा विहीर खोदणे उपयोगाचे नसते. भविष्यातील संभाव्य संकटांचा कानोसा घे आपली सावधानता आणि सिद्धता ठेवलीच पाहिजे. 'बरे सावधान राहावे समय राखोन ।। नाही सारखिया वेळा अवघ्या पावता अवकळा।।' असा संकट काळात सावधगिरी बाळगण्याचा संदेश तुकाराम देतात. आज कोरोना महामारीत ज्यांच्याकडे सिद्धता आणि सावधगिरी आहे तेच टिकणार आहेत. गाफील लोक बाध व्हायला वेळ लागणार नाही.

           महामारीपेक्षा तिच्या अवास्तव धास्तीनेच अधिक लोक दगावल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. मरण्यासाठी आजारापेक्षा धास्तीच अनेकांना पुरेशी असते. म्हणून महामारीत औषधी एवढेच मनोबल महत्त्वाचे ठरते. मनोबल वाढवण्यासाठी जगाच्या बाजारात कोणतेही औषध उपलब्ध नाही. यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत, त्याबद्दल उद्वेग करण्यापेक्षा शांत मनाने त्याचा स्वीकार करणे अधिक हिताचे ठरते. 'ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान' आपत्तीच्या काळात जेंव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असते तेंव्हा त्याचा स्वीकार करणे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने गरजेचे असते. हातात नसलेल्या गोष्टीबद्दल मनस्ताप करू लागलो तर मन:शांती हरवते. 'वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ भोगणे ते फळ संचिताचे ।।' उद्वेगाचे पर्यवसान दुःखात होऊन जीवनात वैफल्य येत आल्याचा मानसशस्त्रीय विचार या अभांगातून तुकारामांनी मांडला आहे. वरवर पाहणाऱ्यांना या अभंगात दैववाद दिसत असला, तरी यात जे मनोविज्ञान दडले त्यातून आज महामारी सोबत जगण्याची एक सम्यक दिशाच  मिळते.

             अनेक वेळा संकटाच्या काल्पनिक भीतीनेच गर्भगळीत होऊन लोक आपले मानसिक संतुलन हरवून बसतात. घाबरल्याने छोटेशे संकट पर्वतापेक्षा मोठे बनते आणि धैर्य बाळगल्या पर्वतापेक्षा मोठे संकट देखील राई एवढे छोटे ठरते. संकटसमयी श्रद्धेचे खादे अधिष्ठान जे आत्मिक बळ देते त्यातून आपले मनोबल उंचावत असते. म्हणून आपल्यातील परमेश्वरावर श्रद्धा ठेवून संकटाला सामोरे जाण्याचा मार्ग तुकाराम दाखवतात. 'आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया ।। आपल्या सोबत परमेश्वर नावाची दिव्य शक्ती आहे, हा विश्वास माणसाचे मनोबल उंचावतो. आपल्या अंतर्मनातील अफाट शक्ती जागवण्यासाठी तुकाराम देवावर भार म्हणजे आपल्या अलौकिक शक्तीवर श्रद्धा ठेवून संकटास सामोरे जाण्याचा संदेश तुकाराम देतात. संकटास सामोरे जाता त्याची धास्ती घेत हात जोडून बसलो तर दुःखच पदरी येत असते. 'भयाचियापोटी दुःखाचिया रासी शरण देवासी जाता भले ।।' आज प्रत्येक माणूस प्रचंड धास्तावलेला आहे. धास्तीतून संकट टळत नसून त्याची तीव्रता वाढत असते. या दृष्टीने बसवेश्वरांचे पुढील वचन उदबोधक ठरते. 'भिऊन नाही चालत / भेदरून नाही चालत / वज्रपंजरी राहून नाही चालत  /  काकुळतीला येऊन नाही चुकत हो /  धीर खचून हतबल झाले तरी /  होणारे नाही ळत कुडलसंगम देवा ' संकटकाळात हातपाय गाळून हतबल होण्यापेक्षा विवेकाने संकट समजून घेत धैर्याने त्याला सामोरे जाणे गरजेचे असल्याचे बसवेश्वर सांगतात.

           कोरोना महामारीची झळ जगातील प्रत्येकाला कमीअधिक बसणारच आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचा मार सहन करण्याची मानसिक तयारी ठेवलीच पाहिजे. दुःखाला कवटाळून बसल्यास त्याचे पर्यवसान वैफल्यात व्हायला वेळ लागत नाही. 'शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाढे ।।' दुःखाने दुःख वाढते आणि धीर धरला तर धीरानं धैर्य बळकट होत असते, असा तुकारामांचा दावा आहे. 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' या उक्तीप्रमाणे संकटाच्या भीतीने  लांब पळणाऱ्यांच्या जीवनात संकटे सतत पाटलाग करतात. 'डगमगी तो वाया जाय धी नाही गोता खाय ।। ढळों नये जरी ला घरिचिया घरी।।' जो डगमगला घाबरला तो वाया जातो. ज्याच्यात धीर नाही तो संकटात पुन्हा पुन्हा गटांगळ्या खातो. कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही आणि कोणत्याही आजारास डगमगत नाही त्याचा आजार घरच्या घरी सुद्धा बरा होतो, असा तुकारामांचा ठाम विश्वास आहे. ज्यांच्या मनात धैर्य आहे असे पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोना आजारावर मात करीत आहेत. ज्यांच्या धैर्य नाही अशा पंचवीस वर्षाच्या तरुणांचाही कोरोनामुळे अंत होताना पाहिल्यानंतर तुकारामांच्या मनोविज्ञानाची झेप नजरेत भरते.

            आज जगातील सर्व माध्यमे करोना महामारींनी व्यापली आहेत. प्राप्त अवकाशात आपण सतत करोनाच्या बातम्या पाहत मनात सदैव त्याचाच जप चालू ठेवला, तर हा करोना आपल्या अंतर्मनात घर करून बसतो. प्रत्यक्षात आजार नसूनही त्याची लक्षणे आपल्यात दिसू लागतात.'ज्याचे जया ध्यान ते चि होय त्याचे मन ।।' कोरोना आजरापेक्षा त्याच्या संशयानेच अनेकांची झोप उडाल्याचे चित्र आज पाहायला मिळते. 'वारुळावर पडलेल्या दोरीला स्पर्श केल्याने / मृत्यू येतो संशयी लोका /  सर्पदंशानेही मरत नाही निसंशयी / कुडल संगमदेवा संशयीची संगत नको'  असे .बसवेश्वर म्हणतात.  स्वामी चक्रधरांनी कोळीयाचा दृष्टांतामध्ये ज्या गोष्टीचाआपणास ध्यास लागतो तसे बन असल्याचे सांगितले. मनास रचनात्मक विचारात गुंतवत आपल्या स्तरावर मानसिक स्वास्थ्याचा नवा मार्ग शोधणे आज नितांत गरजेचे आहे. 'आपुले आपण जाणावे स्वहित जेणे राहे चित्त समाधान।।' जर भावनिक नियोजन उत्तम असेल तर त्याचा सकारात्मक प्रभा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, असा तुकारामांचा दावा आहे.

              मनस्थितीचा परिणाम रोगप्रतिकारक पांढऱ्या पेशीवर होतो. म्हणून मन प्रसन्न ठेवणे हे नितांत गरजेचे ठरते. यादृष्टीने 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।।'  या अभंगात खूप मोठे मनोविज्ञान तुकारामांनी मांडले आहे. सर्व शक्तीचे आणि ऊर्जेचे मूलस्रोत म्हणून संत तुकाराम मानवी मनाकडे पाहतात. रोगप्रतिकारक शक्तीचे आणि मनाचे अंगभूत नाते आहे. मन अस्थिर बनले तर dopamine , Serotonin अशा जीव रसायनांमध्ये असंतुलन होऊन त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अशा काळात कोणताही संसर्ग आला, तर त्याचा प्रभाव होण्याची शक्यता जास्त असते. आजार रोगजंतुमुळे होणारा असो की विषाणूद्वारे होणारा असो रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं हेच महत्त्वाचे ठरते.

          संकट काळात शरीराप्रमाणे मनावर आघात होतात. त्यात जी मानसिक हाणी होते, ती लवकर भरून निघणारी असते. 'भंगलिया चित्ता ना ये काशाने साधिता।।' असे तुकाराम सांगतात. या संदर्भात संत कबीर म्हणतात, 'धरती फाटै मेघ मिले कपडा काटै डौ तन फाटै को औषधी मन फाटे नही ठोर।।' कोरोना महामारीत माणसाची मने मोठ्याप्रमाणात फाटणार आहेत. देशात उद्या मनोरुग्णांची संख्या तीस टक्यांनी  वाढणार असल्याचा मानसतज्ज्ञांचा दावा आहे. एका औरंगाबाद जिल्ह्यात मागील वीस दिवसात अठरा जणांनी कोरोनामुळे आलेली अनिश्चितता आणि नैराश्यातून आत्महत्या केली. मानसिक अस्वस्थतेचे हे बोलके उदाहरण आहे. पण आत्महत्येतून प्रश्न सुटत नसून संकटांचा गुंता अधिक वाढतो. 'अतित्याई देता जीव नये किव देवासी ।।' पराभूत मानसिकतेतून जीव देणाऱ्या भ्रमिष्ट लोकांना देवही जवळ करत सल्याचे तुकाराम तुकाराम नमूद करतात. आर्थिक मंदीतून बाहेर पडणे जेवढे अवघड त्यापेक्षाही मानसिक धक्क्यातून सावरणे अधिक अवघड असते.

            महामारीच्या धास्तीने हवालदील होण्यापेक्षा त्यावर मात करण्याचं दृढनिश्चय आज आवश्यक आहे. 'निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ।।' पराभव डोळ्यासमोर दिसत असला तरी आपल्या सामर्थ्यावर दृढ विश्वास असेल, तर पराभव कधीच होणार नाही. कोणत्याही परिस्थित हार जित मनावर अवलंबून  असल्याचे संत कबीर सांगतात. 'मन के हारे हार है मन के जीते जीत कहे कबीर गुरु पाईये मन ही के परतीत।।' मनातच विजय असेल तर बाहेर माणूस सहज विजय मिळतो. विजय दिसत असूनही आपल्या मनात त्याबद्दल विश्वास नसेल, तर आपण कदापि जिंकू शकणार नाही.

            कोणतीही आपत्ती ही आपल्या मूल्यनिष्ठेची, माणूसपणाची कसोटी पाहण्यासाठी येत असते. तुकारामांच्या काळात 1630 च्या दरम्यान तीन वर्षे प्रचंड मोठा दुष्काळ पडला. त्यातच कॉलरा महामारीची साथ आली. 'काय विटंबना सांगो किती पाषाणा फुटती ऐसे दुःख ।।' असे त्याचे वर्णन तुकारामांनी केले आहे. तेंव्हा माणसे किड्यामुंग्या प्रमाणे मेल्याचे हृदयद्रावक वर्णन परकीय प्रवाशांनी केले आहे. अशा परिस्थितीत ' देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते।।' असा कळवळा तुकारामांनी व्यक्त केला. शाब्दिक कळवळ्यावरच थांबता आपली संपत्ती लोकांना वाटून कर्जखाते इंद्रायणीत बुडवले. संकटात संवेदनशीलता कशी जोपासावी याचा एक उच्च आदर्श तुकारामांनी जगासमोर प्रस्थापित केला. कोरोना महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीमंतकडे जमा असलेला पैसा विनियोगात आला पाहिजे असे सर्व अर्थतज्ज्ञ आज जे सांगत आहेत तो विचार तुकारामांनी सतराव्या शतकात कृतीत आणून दाखवला होता. बसवेश्वरांनी आपल्या दासोह सूत्रातून हाच विचार मांडला होता. संतांच्या संवेदनशीलतेचा कृतिशील वारसा जोपासणे आज आपले उत्तरदायित्व ठरते. संतांच्या सम्यक दृष्टीतून जीवनाकडे पाहून विवेक आणि धैर्याने संकटास सामोरे जात सामाजिक संवेदनशीलता जोपासल्यास प्रत्येक संकटावर मात करता येईल. असा मला विश्वास वाटतो.

डॉ.रवींद्र वैजनाथराव बेम्बरे

प्रमु, मराठी विभाग

वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर

Email-  rvbembare@gmail.com

 Mob - 9420813185

 

टिप्पणियाँ

  1. अतिशय उत्तम लेखन...अभिनंदन सर

    जवाब देंहटाएं
  2. अतिशय उत्तम लेखन...अभिनंदन सर

    जवाब देंहटाएं
  3. संतांच्या प्रमाणाचे दाखले दिल्यामुळे लेखाची आशयघनता नक्कीच वाढली.....

    जवाब देंहटाएं
  4. सर लेख अतिशय उत्तम लिहिलेला आहे प्राप्त परिस्थितीमध्ये आलेखाचे महत्त्व अधिकच वाटत

    जवाब देंहटाएं
  5. अतिशय सुसुंद लेखन, अभिननंदन सारजी.....

    जवाब देंहटाएं
  6. श्री नरहर कुरूदकर यांच्या सारखे लेखन करून नांदेड चे नाव उज्वल करावे असेच छान आपल्या हाताने लेखन व्हावे हीच प्रार्थना .

    जवाब देंहटाएं
  7. या सुंदर लिखाणा बद्दल आपले अभिनंदन !

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा - डॉ. रवींद्र बेम्बरे

संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर

वारकरी संतकवयित्रीचे काव्यधन